u/Ok_Actuator9131

बरेच काही उगवून आलेले

बरेच काही उगवून आलेले

​

तुझ्या इच्छेप्रमाणेच

वणवण केल्यानंतर

जरा मागे वळून पाहिले तर

या क्षुद्र जंतूच्या हळव्या पायांना

यदृच्छया चिकटलेल्या परागकणांतून

बरेच काही उगवून आलेले...

- द. भा. धामणस्कर

मुक्तछंद आणि निसर्ग यांचा सुरेख मिलाफ असलेल्या कविता ही धामणस्करांची शैली. वरवर निसर्ग-कविता वाटल्या तरी त्यांच्या कवितांमध्ये फार सुंदर विचार मांडलेले आहेत. आयुष्यावर, स्वभावावर, तत्वज्ञानावर. वपु जसे तत्त्वज्ञान गद्यातून मांडतात तसेच धामणस्कर पद्यातून.

सर्व नद्या, इच्छा असो-नसो,

समुद्राला मिळतात, त्यांच्या

निमूट आसवांनी सारा समुद्रच

खारट करून टाकलेला.

ही एक कवी रुपी नदी, चौदा ऑगस्टला अनंतात विलीन झाली. आपल्यामागे कवितांनी पेरलेले असंख्य सुंदर विचार ठेवून. द.भा. धामणस्करांना ही एक श्रद्धांजली.

u/Ok_Actuator9131 — 3 days ago

रावीके इस पार

रावीके इस पार सजनवा,

रावीके इस पार..

मिलिंद सोमण बेधुंद होऊन हे गाणं म्हणतोय. गंध चित्रपटातला एक छोटासा रोमॅंटीक सीन. मुळातच लहानपणापासून मिलिंद सोमणला वेगवेगळ्या भुमिकांमधे पाहत आलोय, नेहमीच काही वेगळं करायचा प्रयत्न करतो तो. ही भुमिकाही तशीच एक. एक कलाकार, छायाचित्रकार. घर म्हणजे एक मोठा स्टुडीओच. जागोजागी मोठे पोर्ट्रेटस्. त्या पोर्ट्रेटस् मधे हरवणारा तो, आपल्या कलेत हरवणारा तो. गाणंही तसंच बेधुंद करणारं. प्रेम, दारू, संगीत आणि शब्दांचा मिलाफ दाखवणारं. त्यात तो म्हणतोय ते ही सोनाली कुलकर्णीसाठी. कैफ अधिकच चढते मग गाण्याची.

इस दुनियासे दूर रहेंगे, प्रेम नशेमे चूर रहेंगे,

गाएंगे मेघमल्हार सजनवा, रावीके इस पार...

हे आयुष्य हवंहवंसं वाटतं. असं कलेचा, सौंदर्याचा भोक्ता बनण्याची आस जागते. ह्यामुळे आवडलं का गाणं? नाही, काहीतरी वेगळं कारण आहे. दोन ओळी म्हणून चित्रपटातला तो सीन संपतो. पण त्या गाण्याने आता हृदयात काहीतरी छेडलेलं असतं. काहीतरी अबोल, खोलवर लपलेलं. हरवलेलं प्रेम? जवळ नसलेली प्रेयसी? बेधुंदपणा? नाही, हे काहीतरी अजून खोल असतं, इतकं सहजपणे न उमगणारं. मग ते गाणं शोधण्यासाठी युट्यूबकडे धाव घ्यावी लागते. तिथे फक्त दोनच रिझल्ट गाण्याचे, दोन्ही स्वातंत्र्यापूर्वी रेकॉर्ड केलेले.

प्रेमका दरीया, प्रेमकी नैय्या,

आजा करके पार सजनवा,

रावीके इस पार..

गाण्याला आता नवीन व्हिडीओ आहे. आता संथ वाहती नदी आहे. आणि गाणंही तसंच संथपणे वाहायला लागतं. ह्यामुळे आवडलं का गाणं? खूप जुनं आहे म्हणून? नव्या युगाच्या संगिताने बाटलेलं नाहीये म्हणून? नाही हे पण नाही, काहीतरी वेगळंच कारण आहे ह्यावेळी. गाणं खोलवर कशाला तरी हाक देतंच रहातं. आणि अगदी जिभेवर असलेला शब्द तोंडावर न आल्यासारखा मी फक्त ते ओळखीचं कारण शोधत रहातो.

मेरे सजनवा अब तक न जागे,

जाग उठा संसार सजनवा,

रावीके इस पार....

गाणंही माझ्या अवस्थेवर हसत पुढे जातं. मी तिथेच अडकून बसतो मग. परत परत तेच गाणं लूपवर ऐकत. कदाचित पुन्हा एकदा ऐकल्यावर कळेल काय वाटतंय आपल्याला ह्या आशेवर.

reddit.com
u/Ok_Actuator9131 — 16 days ago

बदलती मैत्री

शब्द तोच राहिला तरी व्याख्या बदलते, वयासोबत मैत्रीचीही संकल्पना बदलते...

आयुष्य मग मी, माझ्याच्या गणितात अडकतं, मैत्रिच्या वाट्याला ते वेळेची वजाबाकीच ठेवतं..

नवी नाती वामनासारखी मन व्यापू पाहतात, दोनाचे चार, चाराचे आठ हात करून थांबतात..

संसाराच्या रहाटगाड्यात सगळेजण अडकतात, नेहमीचा कट्टा, दारुचा गुत्ता पार कोपऱ्यात जातात..

शेजारी राहणारा मित्रही, मुलांच्या शाळेत भेटतो, मुलं काल भांडली नसली तरच आपल्याशी हसतो..

मित्रापेक्षाही गाडीतली शांतता बरी वाटते, वयासोबत मैत्रीची संकल्पनाच बदलते...

reddit.com
u/Ok_Actuator9131 — 19 days ago

स्तब्धता

एक शांत रात्र, भकास रात्र, स्तब्ध रात्र. भरलेलं आकाश, पण तेही शांत. ढगांनी आच्छादलेलं असुनही पूर्णपणे न काळवंडलेलं, जरासं धुरकटलेलं. नजरेत ना चंद्राची चकोर, ना विजांचा थयथयाट.

बाल्कनीत एक लोंबणारं झुंंबर. अंधारातही आपलेपणा जपणारा त्याचा मातकट रंंग. वाऱ्याशिवायचं त्याचं ते अस्तित्व. त्याखालचा बाल्कनीचा एक कोपरा व्यापून टाकणारी झाडं. कुंड्यांमुळे कोंडलेली त्यांची वाढ आणि शोभेसाठी छाटलेली त्यांची पानं. सगळी शांत होती. सगळी थांबली होती. सगळीकडे पसरलेली फक्त स्तब्धता.

स्तब्ध नव्हत्या त्या फक्त दोनच गोष्टी. एकानंतर एक अशा जळणाऱ्या सिगारेट्स आणि त्यांच्याबरोबर मन व्यापून टाकणारे ज्वलंत विचार. चाललेला त्या दोघांचाच विद्रोह ह्या स्तब्धतेच्या विरोधात. चाललेला त्यांचाच उद्रेक, शांततेला भेदणारा.

कुछ और कश लगा ले ए ज़िंदगी,

बुझ जाउंगा किसी रोज़ सुलगते सुलगते...

बराच वेळ चालला तो खेळ. एकीकडे शांतता, स्तब्धता, निरंतरता आणि दुसरीकडे गदारोळ, कल्लोळ आणि क्षणीकता. पायाखाली लोळणाऱ्या थोटकांकडे बघत तो विचारत राहिला, कोण जिंकलं हा खेळ? ती निरंतर स्तब्धता, जी काही क्षणांसाठीच त्या आगीत हरवलेली की ती आग जी तिच्या काही क्षणांच्या आयुष्यात स्तब्धतेला हरवून गेली.

*********************

तो u/hmm_2211 ने सिगारचा फोटो टाकला, त्याच्यावरून आठवलेला जुना लेख...

reddit.com
u/Ok_Actuator9131 — 23 days ago

गोंडस भाव

ईशान्य भारतातील काही गोड चेहरे...

(मॉडस् व्यक्तींचे फोटो चालत नसतील तर सांगा.)

u/Ok_Actuator9131 — 1 month ago